
* ६ जानेवारीला राष्ट्रीय सिद्ध दिन होणार साजरा
चेन्नई, 02 जानेवारी (हिं.स.) - केंद्रीय आयुष मंत्रालय, राष्ट्रीय सिद्ध संस्था आणि सिद्ध संशोधनासाठी केंद्रीय परिषद या आपल्या संलग्न संस्थांच्या सहकार्याने, तसेच तामिळनाडू सरकारच्या भारतीय औषध आणि होमिओपॅथी संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने, 3 जानेवारी रोजी चेन्नई येथील कलाईवनार अरंगम येथे नववा सिद्ध दिवस साजरा करणार आहे. जागतिक आरोग्यासाठी सिद्ध ही या कार्यक्रमाची संकल्पना असून सिद्ध वैद्यकशास्त्राचे जनक म्हणून पूजनीय असलेल्या महर्षी अगस्त्य यांच्या जयंतीनिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त दरवर्षी 6 जानेवारी रोजी सिद्ध दिवस साजरा केला जातो.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन हे 9 व्या सिद्ध दिनाच्या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील तसेच उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला आयुष मंत्रालय (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, प्रतापराव जाधव,तामिळनाडूचे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण मंत्री मा. सुब्रमणियन, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, तामिळनाडूचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव, डॉ. पी. सेंथिल कुमार आणि भारतीय वैद्यक आणि होमिओपॅथी संचालनालय, तामिळनाडूच्या संचालक, एम. विजयलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात तामिळनाडू आणि इतर राज्यांमधील सिद्ध वैद्यकपद्धतीचे वैद्य, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, विद्वान आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच सिद्ध वैधानिक मंडळातील वरिष्ठ सदस्य, राष्ट्रीय सिद्ध संस्था आणि सिद्ध संशोधनासाठी केंद्रीय परिषदेतील संशोधक तसेच आयुष मंत्रालय आणि तामिळनाडू सरकारचे अधिकारी देखील सहभाग घेणार आहेत. याशिवाय चेन्नई आणि पालयमकोट्टाई येथील शासकीय सिद्ध वैद्यकीय महाविद्यालये आणि तामिळनाडू आणि केरळमधील स्वयं-वित्तपोषित सिद्ध महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेटचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
9 व्या सिद्ध दिन समारंभात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, संशोधन आणि जागतिक निरामयता यातील सिद्ध वैद्यकीय पद्धतीचे योगदान सादर केले जाणार आहे. यानिमित्त जागरूकता वाढवणे तसेच आरोग्यसेवांचे वितरण, संशोधन सहकार्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती यासंदर्भातील सरकारची बांधिलकी दृढ करणे या याचा उद्देश आहे. हा कार्यक्रम भारताच्या पारंपरिक वैदयकीय पद्धतींचा राष्ट्रीय आणि जागतिक आरोग्य चौकटीत जास्तीतजास्त प्रसार करणे, नवोन्मेषाला प्रेरणा देणे आणि सिद्ध वैद्यकीय पद्धतीला व्यापक मान्यता मिळवून देणे या आयुष मंत्रालयाच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी