
चेन्नई, 02 जानेवारी (हिं.स.) । भारताला आत्मक्षणासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले. आयआयटी मद्रास येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी पाकिस्तानला ‘वाईट शेजारी’ संबोधत दहशतवादाच्या मुद्द्यावर कठोर इशारा दिला.
यासंदर्भात जयशंकर म्हणाले की, एखादा शेजारी देश जाणूनबुजून आणि सातत्याने दहशतवादाला प्रोत्साहन देत असेल, तर भारताला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार भारत नक्कीच वापरेल, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. भारताला काय करावे किंवा काय करू नये, हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदर्भ देत जयशंकर म्हणाले की, राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची भारताची तयारी आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान तसेच पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून आपल्या संरक्षणाचा अधिकार वापरला, असे त्यांनी नमूद केले. सिंधू जल कराराच्या (1960) संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की, जलवाटपाचा करार ‘चांगल्या शेजारधर्मा’वर आधारित असतो. मात्र, जेव्हा दहशतवाद दशकानुदशके सुरू राहतो, तेव्हा चांगला शेजारी उरत नाही आणि अशा परिस्थितीत त्या कराराचे लाभही अपेक्षित राहात नाहीत. ‘पाणी वाटून घ्यायचे आणि दहशतवाद सुरूच ठेवायचा’अशी भूमिका स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही जयशंकर यांनी भारतासमोरील बहुतांश समस्या पाकिस्तानच्या लष्करातून निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले होते. पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी ‘चांगले’ आणि ‘तितकेसे चांगले नसलेले’ लष्करी नेते असतात, असेही जयशंकर म्हणाले होते.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी