
नवी दिल्ली, 02 जानेवारी (हिं.स.) । मध्यप्रदेशच्या इंदूर शहरात दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेवर माजी मुख्यमंत्री व भाजप नेत्या उमा भारती यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. ही घटना राज्य, सरकार आणि संपूर्ण प्रशासनासाठी लज्जास्पद असल्याचे सांगत दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
इंदूरमध्ये दूषित पाणी पिल्यामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 2800 नागरिक आजारी पडले आहेत. गुरुवारी 338 नवे रुग्ण आढळून आले, तर 32 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) प्रतिक्रिया देताना उमा भारती म्हणाल्या की, 2025 च्या अखेरीस घडलेली ही घटना अत्यंत गंभीर असून तिने संपूर्ण व्यवस्था कलंकित केली आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळालेल्या इंदूरमध्ये अस्वच्छता आणि विषारी पाण्यामुळे नागरिकांचे प्राण जाणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत अपुरी असल्याचे सांगत भारती म्हणाल्या, “जिंदगीची किंमत 2 लाख रुपये नसते. मृतांच्या कुटुंबीयांना आयुष्यभर दुःख सहन करावे लागते. या पापाचे घोर प्रायश्चित्त करणे आवश्यक आहे. पीडितांची माफी मागावी लागेल आणि खालपासून वरपर्यंत जे कोणी दोषी आहेत, त्यांना कमाल शिक्षा दिली पाहिजे. ही मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासाठी कसोटीची वेळ असल्याचे उमा भारती यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, इंदोरच्या भागीरथपुरा येथील आरोग्य केंद्रात सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत रुग्णांची गर्दी होती. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक नागरिक उपचारासाठी येत असून बहुसंख्य रुग्ण उलटी व जुलाबाच्या तक्रारी घेऊन आले आहेत. अनेक कुटुंबांतील सर्व सदस्य आजारी पडल्याने परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी