बांगलादेश टी-२० विश्वचषकासाठी भारतात न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम
ढाका, २० जानेवारी, (हिं.स.) - बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी मंगळवारी स्पष्ट केले की बांगलादेश भारतात आयसीसी टी-२० विश्वचषक खेळण्याबाबतची आपली भूमिका बदलणार नाही. बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतल्यास स्कॉटलंडची जागा घेण्याची शक
बांग्लादेशचा क्रिकेट संघ


ढाका, २० जानेवारी, (हिं.स.) - बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी मंगळवारी स्पष्ट केले की बांगलादेश भारतात आयसीसी टी-२० विश्वचषक खेळण्याबाबतची आपली भूमिका बदलणार नाही. बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतल्यास स्कॉटलंडची जागा घेण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली आहे.

आसिफ नजरुल यांनी सांगितले की, बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिला आहे आणि आयसीसीला त्यांचे सामने सह-यजमान श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली आहे. त्यांनी सांगितले की या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे.

गेल्या आठवड्याच्या शेवटी, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) आणि आयसीसी अधिकाऱ्यांमध्ये ढाका येथे चर्चा झाली होती, परंतु कोणताही तोडगा निघाला नाही. सध्या सुरू असलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजूर रहमानला त्यांच्या संघातून सोडण्याचे निर्देश दिल्याने हा पेच आणखी वाढला.

आयसीसीने हे प्रकरण सोडवण्यासाठी २१ जानेवारीची अंतिम मुदत दिली आहे. जर बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा समावेश करायचा असेल, तर त्यांना तयारीसाठी किमान १५ दिवस द्यावे लागतील, कारण स्कॉटलंड हा विश्वचषकासाठी पात्र ठरू शकलेला सर्वोच्च क्रमांकाचा संघ आहे.बांगलादेशनेही आपला गट बदलण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण आयर्लंडने याला सहमती दर्शवण्यास नकार दिला.

आसिफ नजरुल यांनी पत्रकारांना सांगितले की, मला माहिती नाही की आमच्या जागी आयसीसी टी-२० विश्वचषकात स्कॉटलंडचा समावेश होईल. जर आयसीसीने भारतीय क्रिकेट बोर्डाच्या दबावाखाली आमच्यावर अवास्तव अटी लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या स्वीकारणार नाही.

ते पुढे म्हणाले, यापूर्वी असे काही प्रसंग घडले आहेत जेव्हा पाकिस्तानने भारतात जाण्यास नकार दिला आणि आयसीसीने स्पर्धेचे ठिकाण बदलले. आम्ही तार्किक आधारावर ठिकाण बदलण्याची मागणी देखील केली आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अव्यवहार्य दबावाखाली भारतात खेळण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande