
रायगड, 20 जानेवारी (हिं.स.)। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे राष्ट्रीय स्तरावरील धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अलिबाग येथील आरसीएफ स्पोर्ट कॉम्प्लेक्स, कुरुळ येथे दिनांक २२ ते २६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय फिल्ड इनडोअर अर्चरी स्पर्धा पार पडणार आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ), रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया आणि फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशातील तब्बल १९ राज्यांमधून सुमारे ६५० महिला व पुरुष धनुर्धारांनी सहभाग नोंदविला असून, विविध गटांतील खेळाडूंच्या नेमबाजीचा कस अलिबागमध्ये पाहायला मिळणार आहे. ७ वर्षांखालील, १० वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, वरिष्ठ गट तसेच वरिष्ठ अनुभवी धनुर्धर असे विविध गट या स्पर्धेत खेळवले जाणार आहेत. सर्व गटांमध्ये महिला व पुरुष स्वतंत्रपणे सहभागी होणार असल्याची माहिती फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव सुभाष नायर यांनी दिली.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आरसीएफ स्पोर्ट कॉम्प्लेक्स, कुरुळ येथे पार पडणार आहे. या स्पर्धेतील ‘नाईन स्पॉट’ हा प्रकार विशेष आकर्षण ठरणार असून तो पाच गटांमध्ये खेळवण्यात येणार आहे. १०, १४, १७ आणि १९ वर्षांखालील गटांसाठी प्रथम पारितोषिक २५ हजार, द्वितीय १५ हजार आणि तृतीय १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. वरिष्ठ गटासाठी प्रथम पारितोषिक १ लाख, द्वितीय ५० हजार आणि तृतीय २५ हजार रुपये असणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यासाठी आरसीएफचे कार्यपालक संचालक हिरडे, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, आरसीएफचे चीफ मॅनेजर महेश पाटील तसेच फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाचे व महाराष्ट्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे अलिबाग राष्ट्रीय क्रीडानकाशावर अधोरेखित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके