
ठाणे, 20 जानेवारी (हिं.स.)। ठाण्याच्या सेन्ट्रल मैदानात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘शरद पवार शिल्ड’ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील १९ वर्षांखालील गुणवंत क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या माध्यमातून ठाण्यातील नव्या खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी सुमारे ५५० मुलांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यातून निवडलेल्या ६० खेळाडूंच्या चार संघांची निर्मिती करण्यात आली असून, हे संघ सध्या लिग पद्धतीने एकमेकांविरुद्ध सामना खेळत आहेत. लिग फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, मुंबई अंडर-१९ संघात निवड झालेले अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून, त्यामुळे स्पर्धेची गुणवत्ता आणि रंगत अधिक वाढली आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव उमेष खानविलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच खेळाडूंच्या निवडीसाठी रवि कुलकर्णी, अमित दानी, उमेश गोतखिंडिकर प्रशांत सावत आणि जुल्फिकार पारकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
‘डॉ. जितेंद्र आव्हाड स्पोर्ट्स फाउंडेशन’च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेसाठी रणजित कुमार पिल्लै (डायरेक्टर – स्पेशल प्रोजेक्ट्स, JSW) यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या स्पर्धेमुळे ठाण्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून, भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी नवे खेळाडू घडण्यास मदत होणार आहे.
या स्पर्धेचे अंतिम सामने येत्या २७ व २८ जानेवारी रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे खेळविले जाणार आहेत. या सामन्यांकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर