
पुणे, 04 जानेवारी (हिं.स.)। स्वदेशी बनावटीच्या क्लोज क्वार्टर बॅटल (सीक्यूबी) कार्बाइन या बंदुकींचा पुरवठा पुण्यातील भारत फोर्ज कंपनीकडून भारतीय लष्कराला केला जाणार आहे. याबाबत भारत फोर्जने नुकताच संरक्षण मंत्रालयाशी १ हजार ६६१ कोटी रुपयांचा करार केला. कंपनीकडून पुढील चार वर्षांत २ लाख ५५ हजार बंदुकींचा पुरवठा भारतीय लष्कराला केला जाणार आहे.सीक्यूबी कार्बाइन ही ५.५६ मिमी x ४५ मिमी या प्रकारची आहे. तिची रचना, बनावट आणि निर्मिती भारतीय आहे. शस्त्रास्त्र संरक्षण व विकास संस्था (एआरडीओ), संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारत फोर्जने संयुक्तपणे ही कार्बाइन विकसित केली आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत भारत फोर्ज कंपनीकडून कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स या उपकंपनीच्या माध्यमातून संरक्षण उत्पादन केले जात आहे. संरक्षण दलांना अत्याधुनिक संरक्षण उत्पादने पुरविण्याचे काम कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. कंपनीला गेल्या पाच वर्षांत लष्कराकडून हा चौथा कार्यादेश मिळाला आहे, असे भारत फोर्ज कंपनीने म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु