
* जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार
मुंबई, 04 जानेवारी (हिं.स.)।
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा संपन्न झाली.
या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, आणि रुग्णकेंद्रित सेवा देणे बाबत चर्चा करण्यात आली.
बैठकी दरम्यान नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या दरात औषधे सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात जनऔषधी केंद्र आणि अमृत फार्मसींचे जाळे राज्यात अधिक विस्तारण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी दिल्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णांवरील औषध खर्चाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर मिशन मोडमध्ये विशेष रणनीती राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच तपासणी मोहीम व्यापक करणे, उपचारांमध्ये सातत्य राखणे आणि रुग्णांना पोषण सहाय्य देणे, निक्षय मित्र यांचे मार्फत फूड बास्केट देणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. राज्यातील क्षय रोगाच्या रुग्णांची एक्स-रे तपासणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. केंद्र शासनामार्फत 96 अतिरिक्त हॅन्ड हेल्ड एक्स-रे मशीन राज्याला देण्यात येणार आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना गती देत लोकाभिमुख, सक्षम आणि विश्वासार्ह आरोग्य व्यवस्था उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक प्रभावी बनविण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वाची ठरली आहे. सदर बैठकीसाठी आरोग्य मंत्री यांचे सोबत आरोग्य सचिव इ रवींद्रन, संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी