ठाण्यात ४०वी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला ८ जानेवारीपासून
ठाणे, 04 जानेवारी (हिं.स.)। ठाणे शहरात वैचारिक प्रबोधन करणारी बहुप्रतिक्षित कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला ८ ते १४ जानेवारी या काळात होणार असून यंदाचे हे ४०वे वर्ष असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी दि
ठाण्यात ४०वी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला ८ जानेवारीपासून


ठाणे, 04 जानेवारी (हिं.स.)। ठाणे शहरात वैचारिक प्रबोधन करणारी बहुप्रतिक्षित कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला ८ ते १४ जानेवारी या काळात होणार असून यंदाचे हे ४०वे वर्ष असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी दिली.

व्याख्यानमालेचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पूनावाला यांच्या हस्ते ८ जानेवारीला होणार असून 'वंदे मातरम् और राष्ट्रीय पुनरुत्थान' या परिसंवादात पत्रकार किरण तारे, भारत-पाकिस्तान विभाजन अभ्यासक डॉ.राजीव पुरी आणि पत्रकार मिलिंद भागवत सहभागी होणार आहेत. ९ जानेवारीला 'अनुवंशिकतेतून येणारे आजार व उपाय' या विषयावर पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वैद्यकीय अनुवंश शास्त्रज्ञ डॉ.कौमुदी गोडबोले या मार्गदर्शन करणार आहेत. १० जानेवारीला 'राष्ट्रायस्वाहा: इंदम न मम' या विषयावर सुमेधा चिथडे विचार मांडतील. ११ जानेवारीला संघ शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा विभाग प्रमुख उपेंद्र कुलकर्णी वैचारिक प्रबोधन करतील. १२ जानेवारीला पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारे पुष्प अक्षय जोग समर्पित करणार आहेत. १३ जानेवारीला 'विकासाच्या वाटेवर पूर्वांचल' या विषयावर अमेझिंग नमस्ते फाऊंडेशनचे गुवाहाटीचे अध्यक्ष तथा आय.आय.एम शिलाँग न्यासी मंडळाचे सदस्य अतुल कुलकर्णी पूर्वांचल भागातील विकासावर प्रकाशझोत टाकतील. तर १४ जानेवारीला शेवटचे पुष्प अभिनेता योगेश सोमण गुंफतील. 'चित्रपटसृष्टीची बदलती परिभाषा' या विषयावर ते भारतीय चित्रपट सृष्टीचा प्रवास उलगडतील.

ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूलचे पटांगण, टेलिफोन एक्सचेंजजवळ, नौपाडा, ठाणे येथे या व्याख्यानमालेचे आयोजन ८ ते १४ जानेवारी या काळात दररोज रात्री ८ वाजता करण्यात आले आहे.

या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे या व्याख्यानमालेत आजवर शेकडो राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध क्षेत्रातील मंडळींनी विचार मांडले असून ४० वर्षांत एकाही व्याख्यात्याची पुनरावृत्ती झालेली नाही तसेच कोरोना काळ वगळता गेल्या चार दशकांत ठिकाण, तारीख आणि वेळही बदललेली नसल्याची माहिती रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी दिली. केवळ गगनचुंबी इमारती, उड्डाणपूल, रस्ते सोयी सुविधा म्हणजे शहराचा विकास नसून शहराची वैचारिक जडणघडणही आवश्यक आहे. ही वैचारिक चळवळ म्हाळगी व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली चार दशके अव्याहत सुरू असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande