
अमरावती, 05 जानेवारी (हिं.स.)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या ‘लव्ह जिहाद’ संदर्भातील विधानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कुटुंबांमध्ये मजबूत आणि नियमित संवाद असावा, असे मत भागवत यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ओवैसी यांनी सांगितले की, जर ‘लव्ह जिहाद’सारखी गोष्ट प्रत्यक्षात घडत असेल, तर सरकार आणि संघाने त्याबाबत ठोस पुरावे आणि अधिकृत नोंदी सादर कराव्यात. “जर एखादी मुलगी १८ वर्षांची किंवा मुलगा २१ वर्षांचा असेल आणि ते स्वतःचा निर्णय घेत असतील, तर त्यात कुणाच्या आवडीनिवडीचा प्रश्नच येत नाही. कायदाही याला परवानगी देतो,” असे ते म्हणाले.
ओवैसी यांनी सवाल उपस्थित केला की, जर ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असेल, तर मागील ११ वर्षांचा डेटा संसदेत का सादर केला जात नाही. त्यांनी उपरोधिक टोला लगावत सांगितले की, आधी ‘लव्ह जिहाद’ची नेमकी व्याख्या तरी ठरवा. “जर व्याख्या केली तर भाजपचे अनेक नेते स्वतः लव्ह मॅरेज करणारे आढळतील,” असेही ते म्हणाले.
युवकांना रोजगाराची गरज असून सरकार त्यांचे लक्ष भावनिक आणि वादग्रस्त मुद्द्यांकडे वळवत असल्याचा आरोपही ओवैसी यांनी केला. चीन, लडाख आणि गलवानसारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकार मौन बाळगत असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी