
बीड, 07 जानेवारी (हिं.स.)। अंबाजोगाई येथील एका नामांकित महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापिका डॉ. ममता राठी (जाखोटिया) यांनी स्वतःला पेटवून घेत जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळगाव शिवारात ही घटना घडली. या आगीत त्या ८० टक्क्यांहून अधिक भाजल्या असून त्यांची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे.
या घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. डॉ. राठी यांना तातडीने उपचारासाठी लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाबही नोंदवून घेतला आहे. डॉ. राठी यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचे गूढ अद्याप कायम आहे. पोलीस सध्या कौटुंबिक वाद, कामाचा ताण किंवा इतर काही वैयक्तिक कारणांच्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासादरम्यान एका संशयित व्यक्तीचे नाव समोर आले असून ती व्यक्ती सध्या फरार असल्याचे समजते. पोलीस या फरार व्यक्तीचा शोध घेत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis