
जळगाव, 07 जानेवारी (हिं.स.) शहरातील विसनजी नगर भागातील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि पहिल्या मजल्यावर असलेली दानपेटी कटरने कापून त्यातील सुमारे १५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. दरम्यान ही चोरी झाली असून, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजराती गल्लीत हे प्रसिद्ध जैन मंदिर असून भावेश दिलीप आंबेकर येथे पुजारी म्हणून कार्यरत आहेत. नियमानुसार, मंदिराचे ट्रस्टी दर महिन्याच्या १ तारखेला दानपेटीतील रक्कम बाहेर काढतात. मात्र, मंदिराचे अध्यक्ष सुदेश शहा हे मागील १५ दिवसांपासून बाहेरगावी असल्याने या महिन्याची रक्कम पेटीतच जमा होती. नेहमीप्रमाणे पुजारी आंबेकर मंदिर बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास जेव्हा ते पूजेसाठी आले, तेव्हा त्यांना मंदिराचा दरवाजा तुटलेला दिसून आला. पुजारी आंबेकर यांनी मंदिरात प्रवेश केला असता, पहिल्या मजल्यावरील भिंतीत असलेल्या दानपेटीचा पत्रा कटरने कापलेला आणि वाकवलेला आढळला. पेटीतील सर्व रक्कम लंपास झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने मंदिराचे अध्यक्ष आणि सेवा करणारे राजेश शहा यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मंदिरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर