
जळगाव, 07 जानेवारी (हिं.स.) जमीन खरेदी केल्यानंतर ७/१२ उताऱ्यावर नाव चढवणे आणि फेरफार नोंद करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जामनेर येथील तलाठ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. वसीम राजू तडवी (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या भ्रष्ट तलाठ्याचे नाव असून, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने १६ डिसेंबर २०२५ रोजी जामनेर शिवारात दोन बिनशेती प्लॉट खरेदी केले होते. या प्लॉटच्या खरेदीखतानंतर ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे आणि पत्नीचे नाव लावण्याच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांनी तलाठी कार्यालय गाठले होते. मात्र, ही फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी वसीम तडवी याने त्यांच्याकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने ७ जानेवारी २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत ७ जानेवारी रोजीच सापळा रचला. पडताळणी दरम्यान, पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तलाठी तडवी याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी कायम ठेवून तडजोडअंती ४ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. नियोजित सापळ्यानुसार, तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तडवी याला रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर