
छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील प्रतिष्ठेची महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा शनिवारी सकाळी सहा वाजता पीईएस कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (मिलिंद कॉलेज कॅम्पस) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे होणार आहे. जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून ६०० पेक्षा जास्त मुले व मुली सहभागी होणार आहेत. वैयक्तिक स्पर्धांतील पदकांच्या एकूण गुणसंख्येवर आधारित जिल्हानिहाय संघ अजिंक्यपद प्रदान केले जाईल, तसेच या स्पर्धेच्या आधारे राष्ट्रीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्य संघाचीनिवड केली जाणार आहे. ही स्पर्धा जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष तसेच राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष व माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. ६० राज्यस्तरीय अॅथलेटिक्स अधिकारी, १०० स्वयंसेवक या स्पर्धेसाठी कार्यरत राहतील.
स्पर्धेसाठी पीईएस कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन परिसरात राष्ट्रीय दर्जाचा दोन किलोमीटर लांबीचा क्रॉस कंट्री ट्रॅक राष्ट्रीय अॅथलेटिक्स पंच डॉ. दयानंद कांबळे यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शन व देखरेखीखाली तयार करण्यात येत आहे. जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे, कार्याध्यक्ष डॉ. रंजन बडवणे व कोषाध्यक्ष शशिकला निळवंत हे परिश्रम घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis