
नवी मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.) - अंबरनाथ नगर परिषदेतील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी आज नवी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी वन मंत्री गणेश नाईक ,संजीव नाईक ,दीपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीत जोर लावताना दिसत आहेत. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे. या सर्व घडामोडी घडत सुरू असतानाच अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत नुकतेच निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेससाठी हा सर्वात मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. यामध्ये दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजिवनी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड या 12 नगरसेवकांचा समावेश आहे.
अंबरनाथ शहरात अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. या आघाडीत भाजपा, अजितदादा गट आणि काँग्रेस होती. त्यामुळे काँग्रेसची भाजपसोबत युती झाल्याची राज्यभर चर्चा सुरू होती. राष्ट्रीय पातळीवरही या चर्चेने लक्ष वेधलं होतं. त्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर दखल घेत या 12 नगरसेवकांवर कारवाई केली. त्यामुळे अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील नाराज झाले होते. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी