
नाशिक, 08 जानेवारी (हिं.स.)। - सर्वशाखीय व सर्वभाषीय ब्राह्मण व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल (बीबीएनजी) तर्फे व्यावसायिकांना संधी मिळावी यासाठी ‘फ्युजन फेस्ट’ या प्रदर्शनाचे आयोजन 9, 10 व 11 जानेवारी रोजी लक्षिका मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. ब्राह्मण व्यावसायिकांना व्यासपीठ देणे तसेच समाजाचे व्यावसायिकतेत योगदान वाढवणे या उद्देशाने संस्था गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन 9 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून फ्रावशीच्या संचालिका शर्वरी लथ, बीएसएनएलचे सरव्यवस्थापक सारंग मांडवीकर, अनुरूप विवाह संस्थेचे संचालक तन्मय कानिटकर, जेनेरिक आर्टचे संस्थापक श्रीपाद कोलटकर, बीबीएनजीचे संस्थापक श्रीपाद कुलकर्णी, उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सहयोगी संचालक डॉ.अभिजीत चांदे, संजय लोंढे व महेश देशपांडे उपस्थित राहतील.
प्रदर्शनात विविध उत्पादने, सेवा यांचे स्टॉल्स असून प्रदर्शनादरम्यान भजन स्पर्धा, व्यंजन स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे .या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग विनामूल्य असून नाशिककरांनी प्रदर्शनास यावे असे आवाहन बीबीएनजी नाशिक विकास समन्वयक रसिका कुलकर्णी व फ्युजन फेस्टच्या समन्वयक पूनम शुक्ल यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV