
रत्नागिरी, 8 जानेवारी, (हिं. स.) : महाराष्ट्रात शिक्षित कुटुंबांची संख्या, टीव्ही व स्मार्ट मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या पाहता भविष्य हे डिजिटलमध्ये आहे. त्यामुळे कोकणविषयी चांगल्या व सकारात्मक गोष्टी समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करणे आवश्यक आहे. महामार्ग रखडला, खड्डे पडले हेच सारखे सारखे सांगितल्यामुळे कोकणकडे पर्यटकही पाठ फिरवतात. यातून कोकणचे नुकसान होते. कोकणाविषयी अनेक विषय समाजमाध्यमांतून येण्याची आवश्यकता आहे. यामध्ये कोणते रस्ते सुरू आहेत, वाहतूक व्यवस्था, सण, संस्कृती, निसर्ग पर्यावरण अशा अनेक गोष्टी प्रसारित करता येतील. याकडे साऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन यूट्युबर सुशील कुलकर्णी यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि केजीएन फाउंडेशनतर्फे राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेत द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. या कार्यक्रमात दै. सकाळचे राजापूरचे प्रतिनिधी राजेंद्र बाईत यांना दर्पण पुरस्कार वितरण श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केजीएन व कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, डॉ. शरद प्रभुदेसाई, चंद्रकांत हळबे, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, विवेक पुरोहित, ऋचा जोशी, सुयोगा जठार, दिलीप ढवळे, प्रमोद कोनकर, उमेश आंबर्डेकर, सौ. नीता कुवळेकर आणि शिल्पा पळसुलेदेसाई आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना राजेंद्र बाईत म्हणाले की, गेली २० वर्षे सकाळमध्ये सामाजिक, पर्यावरण, संस्कृती याविषयी विविध प्रकारचे लेखन केले. याकरिता वेगवेगळ्या संपादकांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळाले. कोणताही प्रस्ताव न मागवता रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने दिलेला हा पुरस्कार माझी उमेद वाढवणारा आहे. अनेक मार्गदर्शक, सहकारी व कुटुंबीय यांच्यामुळेच आजवरची ही वाटचाल यशस्वी करता आली आहे.
यावेळी सुशील कुलकर्णी म्हणाले की, पत्रकारांचा सन्मान सामाजिक संस्थांनी करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर किंवा केसरी, मराठाचे लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांच्या विरोधात व भारतीयांच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन वृत्तपत्र चालवले होते. परंतु ज्यांना धंदा करायचा त्यांनी पत्रकार नेहमी तटस्थ असला पाहिजे, असे बोलायला सुरवात केली. आज राष्ट्रहितासाठी पत्रकारांचे योगदान असले पाहिजे.
श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले की, आजचे प्रचंड मोठे डिजिटल जग सर्वांसाठी खुले आहे. येथे विचार मांडता येतात. यूट्यूबच नव्हे तर व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अशी अनेक समाजमाध्यमे तुम्हाला वापरता येतील. तरुण मुले समाजमाध्यमांचा वापर भरपूर करत आहेत. त्यामुळे चांगल्या, सकारात्मक गोष्टी पोहोचवण्यासाठी लोकांनी सक्रिय व्हावे. हे करण्यास अनेकांची मानसिकता नाही, तुम्ही स्वतः पत्रकार व्हा. ब्रेकिंग बातमी समाजमाध्यमातून व्हायरल होते. त्यामुळे याचा गांभूर्याने विचार करावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले.
कोकणात आल्यावर थांबायचे कुठे, खायचे का, कुठून प्रवास केल्यावर अख्खे कोकण पाहू शकेन, कोणत्या घाटात काम सुरू आहे, व्यवसाय कोणते, रोजच्या येणाऱ्या माणसांना कोकणाविषयी सकारात्मक माहिती देण्याची गरज आहे. एक ट्रक ड्रायव्हर दररोज व्हिडीओ करतो. आज सकाळी निघालो, हा रस्ता सुरेख आहे, आता मी जेवण तयार करणार आहे, ही गोष्ट इथे चांगली आहे असे अनेक प्रकारचे व्हिडीओ करतो. करोडो लोक हे बघतात. तो कधीही नकारात्मक तक्रारीचा सूर लावत नाही. जे दाखवेल ते सकारात्मकच. त्यामुळे त्याचे चाहता वर्ग खूप आहे, याचा विचार करून डिजिटल माध्यमांचा उपयोग करावा, अशी सूचना केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी