
जळगाव, 08 जानेवारी (हिं.स.) केंद्रीय भूमिजल बोर्ड, मध्य क्षेत्र, नागपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, येथे “जळगाव जिल्ह्यातील भूजल डेटा आणि जलचर मॅपिंगचे प्रसारण व वापर” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण, केंद्रीय भूमिजल बोर्डाच्या वैज्ञानिक ‘ग’सुश्री सायली टेंभुर्णे, राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात केंद्रीय भूमिजल बोर्डाच्या वैज्ञानिक ‘ग’ सुश्री सायली टेंभुर्णे यांनी प्रास्ताविकाने केली. त्यानंतर वैज्ञानिक ‘घ’सुश्री पौर्णिमा बाराहाते यांनी जळगाव जिल्ह्यासाठी राष्ट्रीय जलचर मॅपिंग अंतर्गत प्राप्त निष्कर्ष, जलचर वैशिष्ट्ये, भूजल संसाधने, व्यवस्थापन धोरणे तसेच CGWB डेटा पोर्टलवरील माहितीबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी “राष्ट्रीय जलचर मॅपिंग अहवाल, जळगाव जिल्हा” तसेच जिल्हा पुनर्भरण योजना अधिकृतपणे सामायिक करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी भूजल डेटा प्रसार व डेटा पोर्टलच्या विकासासाठी CGWB च्या प्रयत्नांचे कौतुक केले तसेच सर्व विभागांनी जिल्हास्तरीय नियोजनात या संसाधनांचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन केले. कार्यशाळेचा समारोप सहभागी अधिकाऱ्यांच्या अभिप्रायाने झाला. या कार्यशाळेत WRD, WCD, जिल्हा परिषद लघुसिंचन, कृषी विभाग आदी विभागांतील एकूण १६ अधिकारी सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर