

रायगड, 8 जानेवारी, (हिं.स.)। टाइम्स फाउंडेशनच्या वतीने ‘सीएसआर चेंजमेकर्स सर्कल’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्राईस्ट युनिव्हर्सिटी, -लवासा कॅम्पस येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला क्राईस्ट युनिव्हर्सिटी, M3M फाउंडेशन आणि कराडी पाथ हे भागीदार म्हणून सहकार्य लाभले. सामाजिक उत्तरदायित्व (CSR) क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था, तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी हा कार्यक्रम संवाद, विचारमंथन आणि नेटवर्किंगचे प्रभावी व्यासपीठ ठरला.
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ मुंडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर मुळशीचे तहसीलदार श्री. विजयकुमार चोबे हे सन्माननीय पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. पुणे, मुंबई, नाशिक आणि सोलापूर येथून सीएसआर नेते तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी समाज कल्याण क्षेत्रातील कार्याची गरज, त्याचा दीर्घकालीन परिणाम आणि शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांमधील समन्वय यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणातून उपस्थितांना व्यावहारिक दिशा व सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. यावेळी डॉ. फादर लिजो थॉमस (डीन व संचालक, क्राईस्ट युनिव्हर्सिटी), डॉ. ऐश्वर्या महाजन (अध्यक्ष, M3M फाउंडेशन) आणि डॉ. सी. पी. विश्वनाथ (सीईओ, कराडी पाथ एज्युकेशन कंपनी) यांनी प्रेरणादायी भाषणे करून सीएसआर क्षेत्रातील जबाबदाऱ्या आणि संधी अधोरेखित केल्या.
‘Think Critically, Act Effectively’ या विषयावर झालेल्या पॅनल चर्चेत लीना राजन, वनिता गणेशन, रामानुज चौबे, सत्या नटराजन, डॉ. मिशेल फिलिप, तरुण जोशी, ऋषी राज सिंग, ॲड. अमेय देशपांडे, योगेश कौतिक पाटील गुर्जर आणि श्रुतिका मुंगी यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. परमेश्वरन एस. (डीन, क्राईस्ट युनिव्हर्सिटी) यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
या उपक्रमामुळे सरकारी अधिकारी, सीएसआर नेते आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये अर्थपूर्ण संवाद व व्यावसायिक नेटवर्किंगला चालना मिळाली. टाइम्स फाउंडेशनच्या ‘चेंजमेकर्स सिरीज’ अंतर्गत भविष्यातही अशाच प्रभावी व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके