
छत्रपती संभाजीनगर, 8 जानेवारी, (हिं.स.) - नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. या भव्य कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या अनुषंगाने मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे उपस्थित होते.
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्ह्यातून सहभागी होणाऱ्या सिख, सिकलकरी, बंजारा, लबानी, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, भगत नामदेव, उदासीन समाजातील धर्मगुरू, अध्यक्ष व मान्यवरांची लवकरच आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नांदेडकडे जाणाऱ्या विशेष रथाचा मार्ग निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. यासाठी हिंगोली येथील संबंधित समाजांचे प्रमुख, धर्मगुरू व मान्यवरांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यासोबतच शालेय विद्यार्थ्यांसाठी सरताज गीत, प्रभात फेरी, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शिक्षण विभागाने विविध स्पर्धांचे आयोजन करावे व त्याबाबत माहिती सादर करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis