
जळगाव, 08 जानेवारी (हिं.स.) : जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया व 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा व विशेषतः जळगाव शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था, शांतता व सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान आवश्यक सुरक्षा व्यवस्था, विविध यंत्रणांमधील समन्वय तसेच तत्काळ प्रतिसाद यंत्रणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यक व स्पष्ट निर्देश देण्यात आले. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे, उप विभागीय अधिकारी विनय गोसावी आदी अधिकारी उपस्थित होते. लोकशाही प्रक्रियेची सुव्यवस्था व विश्वासार्हता कायम राखण्यासाठी निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही दबावाविना निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर