
रायगड, 08 जानेवारी (हिं.स.)।पाणी फाउंडेशन, रायगड जिल्हा कृषी विभाग, आत्मा विभाग व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कप २०२६ अंतर्गत कोकण विभागातील पहिले तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराचा समारोप बुधवारी (ता. ७) माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या सभागृहात उत्साही वातावरणात झाला. या प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्ह्यातील एकूण ५० महिला व पुरुष शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
फार्मर कप २०२६ ही स्पर्धा पाणी फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, राज्यातील शेती उत्पादनात वाढ करणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला चालना देणे तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याने यंदा सहभाग घेतला असून, जिल्ह्यातील कर्जत तालुक्याची प्रथम निवड करण्यात आली. त्यानुसार ५ ते ७ जानेवारीदरम्यान या तालुक्यातील निवडक ५० शेतकऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
शिबिरादरम्यान गटशेती, स्मार्ट शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीतील नवकल्पना आणि प्रयोगशीलता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना एकत्रितपणे शेती करण्याचे फायदे, खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या पद्धती तसेच शाश्वत शेतीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
समारोप कार्यक्रमास आत्मा विभागाचे संचालक सुनील बोरकर, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक नामदेव ननावरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना सुनील बोरकर यांनी शेती क्षेत्रातील बदल स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. “सतत शिकणारा, नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारा आणि एकत्रितपणे शेती करणारा शेतकरीच यशस्वी ठरतो,” असे ते म्हणाले. पाणी फाउंडेशन शेतकऱ्यांमध्ये आशा व आत्मविश्वास निर्माण करत असून, अशा प्रशिक्षणातून कोकणातील शेतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके