
रत्नागिरी, 8 जानेवारी, (हिं. स.) : हिंदू ही एक जीवन पद्धती आहे. हिंदू संस्कृती समावेशक, अद्वितीय आहे. ती जागतिक असून व्यक्ती व कुटुंब आणि विश्व, समाजाच्या हिताची आहे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये स्व- भाषा, स्व- भूषा, स्व- भोज हे विषय महत्त्वाचे आहेत. या तिन्ही गोष्टींमध्ये आपण मूल्य म्हणून पाहावे व नवीन गोष्टीचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन लेखिका, भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सहसंघटन सचिव सौ. नयना लिमये- सहस्रबुद्धे यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी गुंफले. त्यांनी बदलती जीवनशैली व हिंदू कुटुंबांसमोरील आव्हाने याविषयी उद्बोधक विचार मांडले. त्यांनी बहुमोल विचार मांडले. त्या म्हणाल्या की, हिंदू संस्कृतीने आवश्यक बदल स्वीकारले. अर्थात काही बदल कृत्रिम व संघटित पद्धतीने बाजारपेठ म्हणून पूरक माहिती पेरली जाते. असे अनेक बदल समाजमाध्यमातून पेरले जात आहेत. परंतु आपण ही माहिती सत्य आहे का, याची खात्री करूनच स्वीकारावी. आपल्याला धोका दिसतो तेव्हा कोणते बदल घडवायचे, कोणते स्वीकारायचे, हे ठरवले पाहिजे. हवे आहे ती स्वीकारायचे, नकोय ते सोडून द्यायचे याची मुभा हिंदू संस्कृतीने दिली आहे. त्यामुळे ही एक प्रकारे आध्यात्मिक लोकशाही आहे, त्यामुळे आपण त्याकडे कौतुकाने पाहिले पाहिजे, असे सौ. सहस्रबुद्धे म्हणाल्या.
हल्ली आजच्या पिढीला घरात जेवण करायची सवय नाही. परंतु आपण बाहेरून जेवण आणले तर त्यातील पोषणमूल्य पाहिले पाहिजे. नवीन भोजन प्रकार शिका, पण पोषण मूल्यांशी तडजोड करू नका. कपड्यात बदल होणार आहेत. परंतु फॅशन इंडस्ट्री ही एक सामूहिक यंत्रणा राबवते. त्यावेळी आपण विचार केला पाहिजे. कपडे परिधान करताना शालीनता मूल्य जपले पाहिजे. हे मूल्य पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.
१९९० नंतर शहरीकरण वाढले आणि एकत्र कुटुंबपद्धती बदलू लागली. आज घरात जेवण तयार आहे, हे घरातील सदस्यांना मोबाइलवर कळवले जाते. हे धोकादायक आहे. सध्या रीलच्या जमान्यात भान उरलेले नाही. त्यामुळे सकारात्मक गोष्टींच्या रील्स बनवा व त्या पाठवा. नोकरीत बैठ्या जीवनशैलीमुळे व ताजे अन्न न खाल्ल्याने आजार वाढले आहेत. आपण आभासी संपर्कात आहोत. कष्ट कमी झाले व पैसे भरपूर झाले आहेत, असे त्या म्हणाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी