रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय युवा संसद कार्यशाळा
रत्नागिरी, 8 जानेवारी, (हिं. स.) : विद्यार्थी युवकांना संसदीय आणि विधिमंडळीय कामकाजाची ओळख व्हावी, त्यांच्यातील वादविवाद, वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्य विकसित व्हावे, या हेतूने राज्यशास्त्र विभाग आणि मुंबईतील युवक बिरादरी (भारत) यांच्या संयुक्त विद्य
युवक बिरादरी


रत्नागिरी, 8 जानेवारी, (हिं. स.) : विद्यार्थी युवकांना संसदीय आणि विधिमंडळीय कामकाजाची ओळख व्हावी, त्यांच्यातील वादविवाद, वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्य विकसित व्हावे, या हेतूने राज्यशास्त्र विभाग आणि मुंबईतील युवक बिरादरी (भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय युवा संसद कार्यशाळा महाविद्यालयात पार पडली.

युवक बिरादरी ही महात्मा गांधी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून क्रांती शहा यांनी १९७४ मध्ये स्थापन केलेली राष्ट्रीय संस्था असून तरुण वर्गात लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे, युवकांमधील सुप्त गुण विकसित करणे, सामाजिक आणि राष्ट्रीय बांधणीत तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून अभिरूप युवा संसद, युवा भूषण आणि स्मृती वाचन स्पर्धा, युवा शिबिरे, समुदाय विकास कार्यक्रम, पर्यावरण संरक्षण अशा विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन देशभरात करण्यात येते.

प्रास्ताविकात राज्यशास्त्र विभागाचे प्रा. नीलेश पाटील यांनी उपस्थितांना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित विविध कार्यक्रम आणि युवक बिरादरी संस्थेची माहिती सांगून कार्यशाळा आयोजनामागील पार्श्वभूमी विशद केली.

दोन सत्रांत पार पडलेल्या या कार्यशाळेत युवक बिरादरीचे कार्यकारी समन्वयक अॅड. वेदांत माईणकर आणि संचालक प्रा. नागेंद्र राय यांनी साधनव्यक्ती म्हणून काम पाहिले. पहिल्या सत्रात अॅड. माईणकर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राजकीय व्यवस्था, संसदीय कार्यप्रणाली, संसदीय कामकाजातील संकल्पना यावर सैद्धांतिक स्वरूपात मार्गदर्शन केले, तर दुसऱ्या सत्रात संचालक प्रा. राय यांनी विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून संसदीय कामकाजाचे सादरीकरण करून घेतले. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध समकालीन घडामोडींवर विचारमंथन केले. विद्यार्थ्यांना आयत्या वेळी देण्यात आलेल्या विषयावरील मतप्रदर्शनानंतर तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी ओंकार आठवले आणि जान्हवी जोशी यांची पुढील फेरीकरिता निवड करण्यात आली. या दोन्ही विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते युवक बिरादरीच्या वतीने पाच हजार रुपयांचा धनादेश परितोषिक म्हणून देण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी भूषविले. मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, राजकारणाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक स्वरूपाचा आहे. समकालीन परिस्थितीत राजकीय साक्षरता अत्यंत महत्त्वाचा पैलू असून, नागरिक राजकीयदृष्ट्या साक्षर असणे आवश्यक आहे. युवा संसद म्हणजे भविष्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधूनच एक चांगले राजकीय नेतृत्व तयार होण्याची संधी आहे. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होत असल्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात त्यांचा लाभ घेतला पाहिजे.

यावेळी व्यासपीठावर संचालक प्रा. नागेंद्र राय, कार्यकारी समन्वयक अॅड. वेदांत माईणकर, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. नीलेश पाटील आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande