
रायगड, 8 जानेवारी, (हिं.स.)। मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकाच्या पुढे असलेले भिवपुरी रोड येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक २१ गेल्या दोन दिवसांपासून दुरुस्ती कामासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. हे फाटक नेरळ पूर्व व पश्चिम भागाला जोडणारे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन असल्याने त्याच्या बंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
7 जानेवारीपासून सुरू झालेल्या या दुरुस्ती कामामुळे हजारो वाहनांची रोजची ये-जा अचानक ठप्प झाली. दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर असलेल्या या फाटकातूनच अनेक नागरिक दैनंदिन कामासाठी प्रवास करतात. मात्र फाटक बंद असल्याने नेरळ पूर्व भागातील वाहनचालकांना पश्चिम भागात जाण्यासाठी आंबिवली येथील फाटक क्रमांक २२ किंवा दामत रेल्वे फाटक क्रमांक २० या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.
या दोन्ही पर्यायी मार्गांवरील रस्ते खड्डेमय असल्याने प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे. वाढलेले अंतर, खराब रस्ते आणि वाहतूक कोंडी यामुळे वेळेची मोठी हानी होत असून इंधनाचा अतिरिक्त खर्चही वाहनचालकांच्या खिशाला झळ पोहोचवत आहे. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच लहान व्यावसायिक यांना याचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून फाटकातील रुळांमधील खडी बदलणे, फेवर ब्लॉक टाकणे तसेच रेल्वे मार्किंगच्या बाजूने डांबरीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. तीन दिवसांत काम पूर्ण करण्याचा दावा प्रशासनाने केला होता. आज ७ जानेवारी रोजी बंदीचे दोन दिवस पूर्ण होत असून, शुक्रवार दिनांक ९ रोजी हे फाटक पुन्हा वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, लवकरात लवकर फाटक सुरू करून वाहनचालकांना होणारा वेळ व आर्थिक भुर्दंड टाळावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके