
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)बालविवाहासारखी सामाजिक कुप्रथा रोखण्यासाठी येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने ‘बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना बालविवाह विरोधी ऑनलाईन शपथ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या स्वाक्षरीचे स्वतःच्या नावाचे प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी https://stopchildmarriage.wed.gov.in/campaign या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन शपथ घ्यावी व प्रमाणपत्र त्वरित डाउनलोड करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण, आरोग्य व भविष्यावर गंभीर आणि विपरीत परिणाम होत असल्याने समाजातील प्रत्येक घटकाने याविरोधात एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. एक व्यक्तीची शपथ म्हणजे एका मुलीच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ऑनलाईन शपथ घेण्याची प्रक्रिया :
नागरिकांनी गुगलवर बाल विवाह मुक्त भारत पोर्टल (Bal Vivah Mukt Bharat Portal) असे टाईप करून संबंधित संकेतस्थळ उघडावे. त्यानंतर लॉगिन वर क्लिक करून टेक प्लेज (Take Pledge) या पर्यायाची निवड करावी. आवश्यक वैयक्तिक माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा दिसेल. मी प्रतिज्ञा घेतली या पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.
बालविवाह मुक्त भारत व बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा घडविण्यासाठी सर्व नागरिकांनी या ऑनलाईन शपथ अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis