
रायगड, 08 जानेवारी (हिं.स.)। माणगाव तालुक्यातील रा. जि. प. केंद्रशाळा, गांगवली या शाळेला पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमामुळे नवे रूप लाभले आहे. ५७ विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेली गांगवली केंद्रशाळा ही परिसरातील महत्त्वाची शैक्षणिक संस्था असून, गेल्या काही वर्षांत शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. पावसाळ्यात छत गळणे, भिंतींचे प्लास्टर पडणे, स्वच्छतागृहांची दुरवस्था यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत होते. ही बाब लक्षात घेऊन पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने शाळेच्या सर्वांगीण नूतनीकरणाची जबाबदारी स्वीकारली. सीएसआर उपक्रमांतर्गत शाळेचे छप्पर बदलून नवीन पत्रे बसविण्यात आली, संपूर्ण इमारतीचे आकर्षक रंगकाम करण्यात आले, तसेच स्वयंपाकघर व स्वच्छतागृहांची दर्जेदार दुरुस्ती करण्यात आली.
यासोबतच नवीन इलेक्ट्रिकल फिटिंग व प्लंबिंगद्वारे आधुनिक व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या कामांमुळे शाळेचे वातावरण स्वच्छ, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी आनंददायी झाले आहे. येत्या काळात शाळेस संगणक सुविधा उपलब्ध करून देण्याचेही कंपनीकडून नियोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना गटशिक्षणाधिकारी सौ. सुरेखा तांबट म्हणाल्या, “पोस्को कंपनीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच या कार्याचे यश दर्शविते.”
यावेळी पोस्को कंपनीचे अधिकारी श्री. यौंग हा किम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, “शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात योगदान देणे हा पोस्को परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे मत व्यक्त केले.
पालकांनीही आर्थिक मर्यादांमुळे अशक्य वाटणारे हे काम पोस्कोच्या सहकार्यामुळे पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी नव्या, स्वच्छ शाळेत अधिक उत्साहाने अभ्यास करण्याचा संकल्प व्यक्त केला. विशेष म्हणजे, पोस्को महाराष्ट्र स्टीलने सीएसआर अंतर्गत नूतनीकरण केलेली ही १६ वी शाळा असून ग्रामीण शिक्षणासाठी कंपनीचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. शाळेच्या पूर्ण नूतनीकरणानंतर कार्यक्रमास पोस्को कंपनीचे अधिकारी श्री. यौंग हा किम, श्री. महेंद्र तट्टे, माणगावचे गटशिक्षणाधिकारी सौ. सुरेखा तांबट, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके