
पुणे, 08 जानेवारी, (हिं.स.)। महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांकडून शहरातील वाहतूक कोंडी सोडविले जाणार, असे आश्वासन दिले जात आहे. मात्र, ज्या ठिकाणी सगळ्या शहराचा कारभार चालतो तो पुणे महापालिका भवनाचा परिसरच भयंकर वाहतूक कोंडीत अडकला आहे. प्रशासक काळातच या ठिकाणी चारचाकी व दुचाकी लावण्यासाठी जागा शिल्लक नाही.मग १६५ नगरसेवक, त्यांचे शेकडो कार्यकर्ते आल्यानंतर महापालिकेत सामान्य नागरिकांना सोडाच, ‘माननियांना’ आणि अधिकाऱ्यांनाही गाड्या लावण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळे स्वतःच्याच अंगणात महापालिकेची कोंडी अशी अवस्था होणार आहे. गेल्या वर्षभरापासून यावर पत्रव्यवहार सुरू असला, तरी प्रशासनाने तोडगा काढला नसल्याने गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
पुणे महापालिका भवनात महापालिकेचे सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. विविध प्रकारची कामे घेऊन रोज सुमारे दोन हजार नागरिक महापालिकेत येतात. कर्मचारी वर्ग आणि नागरिकांची वाहने लावण्यासाठी महापालिकेच्या आवारात जुन्या इमारतीच्या समोर एक मजली वाहनतळ आहे. तेथे या वाहनतळामध्ये सुमारे ३०० दुचाकींची क्षमता आहे, तर तळमजल्यात सुमारे ७० व त्याच्या वरच्या बाजूला ३० चारचाकी गाड्या लावल्या जातात.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु