
सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)। भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महापालिका निवडणूक प्रमुख पदावरून मुक्त करण्याची विनंती केल्यानंतर पुन्हा लवकरच सोलापुरात येऊ, असे सांगणारे रघुनाथ कुलकर्णी सध्या मुंबईत कन्येच्या प्रचारात व्यस्त आहेत. भाजपने त्यांची कन्या सायली कुलकर्णी यांना प्रभाग क्रमांक ६० मधून उमेदवारी दिली आहे.भाजपने अंदमान - निकोबारचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांची महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली होती. मात्र, मूळचे सोलापूरचे असलेले कुलकर्णी हे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जवळचे असल्याचा आरोप करत पक्षातून त्यांना विरोध झाला होता. तर त्यांनी बोलावलेल्या आमदारांच्या दोन बैठकांना गैरहजर राहत आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्यावर अघोषित बहिष्कारच टाकला होता.त्यामुळे पक्षाने त्यांची उचलबांगडी करत आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. परंतु जिल्हा परिषद निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याच्या कारणाने त्यांनी त्या जबाबदारीतून मोकळे करण्याची विनंती प्रदेशाकडे केली होती. त्यानंतर कुलकर्णी यांनी आपण लवकरच पुन्हा सोलापुरात येऊ, असे सांगितले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड