
नाशिक, 08 जानेवारी (हिं.स.)। नाशिकमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे नाशिकसाठीही समान नियम लागू करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने नाशिक क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांच्याशी फोनवरून संवाद साधताना त्यांनी हे बदल करण्यास अनुकूलता दर्शवली.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज उद्योग मंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील विविध उद्योजक, संघटना आणि मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी नाशिक शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी मुंबई, पुणे ठाण्याप्रमाणे नाशिकमध्येही समान नियम लागू करावे अशी मागणी क्रेडाईच्या वतीने करण्यात आली. याबाबत सामंत यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधून क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. नाशिक मधील विकासकांनी मांडलेली अडचण समजून घेत त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा अडसर दूर झाल्यावर नाशिकमध्येही समान नियम लागू करू असे सांगितले.
मुंबई, पुणे, ठाणे याठिकाणी नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार ९ मीटर रुंदीच्या रस्त्यांना लागून असलेल्या इमारतींना १.८ ते २ आणि त्यावर अधिक ०.५
इन्सेटिव्ह एफएसआय असा २.५ पर्यंत एफएसआय मिळत असल्याने रस्त्यालगत असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करणे विकासकाना व्यवहार्य ठरते मात्र नाशिकमध्ये तो फक्त १.४ पर्यंतच मिळत असून अतिरिक्त ०.३ % एफएसआय विकत घ्यावा लागतो. त्यामुळे नऊ मीटर रस्त्याला लागून असलेल्या इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याचे क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच मुंबई, पुणे, ठाणे याठिकाणी इमारतीची उंची मोजताना पोडियम पार्किंग सोडून मोजली जाते मात्र नाशिकमध्ये ती पोडियम पार्किंग सहित मोजली जाते त्यामुळे विकासकाना त्याचे नुकसान होत असल्याचे क्रीडाईच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.यावर या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी निवडणुकीनंतर मुंबई, पुणे, ठाण्याप्रमाणे नाशिक शहरातही समान नियम लागू केले जातील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसे निर्देश नगरविकास विभागाला देण्यात येतील असेही शिंदे यांनी यावेळी फोनवरून बोलताना सांगितले.
नाशिक शहरात ९ मीटर रस्त्याला लागून असलेल्या इमारतींची संख्या ८ ते १० हजार एवढी आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे नाशिकमध्येही समान नियम लागू झाल्यास त्याचा मोठा फायदा या इमारतींच्या पुनर्विकासाला होईल. आपले म्हणणे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवून तत्काळ याबाबत ठोस कारवाई केल्याबद्दल नाशिक क्रीडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर आणि उपाध्यक्ष उदय घुगे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर