
सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)। ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेला गुरुवारपासून सुरवात होत आहे. दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आज पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर मंदिर परिसरात सोलापूर शहर पोलिसांचे मॉकड्रिल पार पडले.
सोलापूर शहर पोलिसांच्या कंट्रोल रुमला अनोळखी व्यक्तीचा ‘डायल ११२’ वरून कॉल आला. श्री सिद्धेश्वर मंदिरात दहशतवादी शिरल्याचे सांगून समोरील व्यक्तीने कॉल ठेवून दिला. त्यानंतर अवघ्या पाच ते सात मिनिटात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत दंगा नियंत्रण पथकाचे अंमलदार (आरसीपी), जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी) देखील हाती शस्त्र घेऊन आले होते. परिसरातील भाविकांना काहीच समजेना. पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवित एकामागून एक गाडी येत होती. रुग्णवाहिका देखील त्याठिकाणी दाखल झाली.यावेळी पोलिस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, दिलीप पवार, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलिस निरीक्षक तानाजी दराडे, संगीता पाटील आदी अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड