
सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)।
बंडखोरी करत अपक्ष व दुसऱ्या पक्षाकडून महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या सात माजी नगरसेवकांसह २८ कार्यकर्त्यांवर शहर भाजपने निलंबनाची कारवाई केली आहे. यात माजी उपमहापौर राजेश काळे, विठ्ठल कोटा, वैभव हत्तुरे, श्रीनिवास करली, डॉ. राजेश अनगिरे या माजी नगरसेवकांचा समावेश आहे.महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून १०२ जागांसाठी ८०० हून अधिक कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, उमेदवारी डावलल्याने आणि आयातांना उमेदवारी दिल्याने माजी नगरसेवकांसह काही कार्यकर्ते बंडखोरी करत अपक्ष व अन्य पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरून पक्षाला आव्हान दिले आहे. तर काहींनी पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत. त्यांना पक्षाची शिस्त, विचारधारेशी इमान राखत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा शहराध्यक्ष तडवळकर यांनी दिला होता. मात्र, त्यानंतरही निवडणुकीतून माघार न घेतलेल्या व पक्षविरोधी कारवाया सुरू ठेवलेल्या २८ जणांवर निलंबनाची कारवाई केल्याचे शहराध्यक्ष तडवळकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड