सोलापूरच्या उमेदवारांचा ७०० रिक्षांमधून प्रचार
सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांकडून प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असून, आपले नाव, पक्षचिन्ह मतदारांच्या लक्षात राहावे यासाठी प्रचारासाठी
सोलापूरच्या उमेदवारांचा ७०० रिक्षांमधून प्रचार


सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांकडून प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असून, आपले नाव, पक्षचिन्ह मतदारांच्या लक्षात राहावे यासाठी प्रचारासाठी रिक्षांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. सध्या सोलापूर शहरात सुमारे ४५० रिक्षा प्रचाराच्या मैदानात उतरल्या असून, आणखी २५० रिक्षाचालक परवानगी मिळविण्यासाठी नॉर्थकोर्ट मैदानावर रांगेत उभे आहेत. प्रत्येक रिक्षासाठी उमेदवारांकडून दररोज १२०० ते १६०० रुपयांपर्यंत भाडे दिले जात आहे. ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का…’ अशा घोषवाक्यांसह स्पीकर लावलेल्या रिक्षा शहरातील गल्लीबोळातून फिरत असून, मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रिक्षा प्रचारामुळे शहराचे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. दुसरीकडे माकप, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्रितपणे लढत आहे. एमआयएम स्वबळावर असून अपक्षांची संख्या २०० हून अधिक आहे. सध्या शहरातील कोणत्याही नगरात, बाजारपेठेत, रस्त्यांवर गेला तर त्याठिकाणी प्रचाराच्या रिक्षा, उमेदवारांचे बॅनर दिसतातच. उमेदवार दररोज रिक्षावाल्याला एक वेळचे जेवण व चहा-नाष्टा देत आहेत. प्रत्येक रिक्षाला दररोज कोणत्या भागात फिरायचे, कोठे थांबायचे हे ठरवून दिले जाते. रिक्षासमवेत उमेदवाराचा एक व्यक्ती फिरतो. आपल्या प्रभागातील छोटी छोटी गल्लीबोळं उमेदवाराला देखील माहिती नसतात, ते रिक्षावाल्यांना माहिती असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande