सोलापूर - महापालिका निवडणुकीमुळे  5 दिवसांसाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)। महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. प्रचाराच्या निमित्ताने सोलापूर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकन
सोलापूर - महापालिका निवडणुकीमुळे  5 दिवसांसाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द


सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)। महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. प्रचाराच्या निमित्ताने सोलापूर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार आहेत. दरम्यान, सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकूण चार हजार ६०० पोलिसांचा बंदोबस्त नेमला जाणार आहे. त्यात राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकड्या, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल देखील आहे. निवडणुकीमुळे १२ ते १७ जानेवारीपर्यंत सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या जाणार आहेत. असा निर्णय संपूर्ण राज्यभरात (महापालिका कार्यक्षेत्रातील पोलिस) होईल, असे सूत्रांनी सांगितले.

सोलापूर शहरातील सण-उत्सवात वर्षातील सुमारे १५० दिवस बंदोबस्ताची ड्यूटी करणाऱ्या पोलिसांना आता निवडणुकीच्याही बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागणार आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या कारणातून शहरात बाळासाहेब सरवदे या तरुणाचा खून झाला. महापालिकेतील १०२ जागांसाठी साडेपाचशे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी १० जानेवारीपासून शहरातील काही ठिकाणी पोलिस ठाण मांडून असणार आहेत. सध्या शहरातील गस्त वाढविण्यात आली असून रात्री दहानंतर विनाकारण रस्त्यांवर थांबणाऱ्या किंवा फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande