
जळगाव, 08 जानेवारी (हिं.स.) जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आज गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. मात्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा अचानक रद्द झाला. तरीही शिवसेनेने प्रचारात कोणताही खंड पडू न देता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अनुपस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या अन्य नेत्यांसह, पदाधिकाऱ्यांना सोबत घेत नियोजित रोड शोला सुरुवात केली. यावेळी महाविजय रथ यात्रेला जनसागर लोटला गेला होता. दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो झाला होता. यानंतर आज गुरुवारी जळगाव शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोड शो निमित्त जय्यत तयारी करण्यात आली होती. महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रोड शोसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. बॅनर्स, झेंडे, फलक लावून संपूर्ण मार्ग भगवेमय करण्यात आला होता. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला दिसून येत होता. मात्र, ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाला. यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसले.तरीही शिवसेनेने प्रचारात कोणताही खंड पडू दिला नाही. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अनुपस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या अन्य नेत्यांसह, पदाधिकाऱ्यांना सोबत घेत नियोजित रोड शोला सुरुवात केली. ठरलेल्या वेळेनुसार रोड शोच्या माध्यमातून जळगाव शहरातील विविध मार्गावरून प्रचार रॅली काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या रोड शोमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नेते आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोड शो दरम्यान पालकमंत्री पाटील यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून जळगाव शहरात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली असून जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर