
पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)महापालिका निवडणुकांसाठी वंचितकडून आघाडीला ४० जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु ही युती होऊ शकली नाही. याशिवाय काँग्रेसकडून चुकीचा प्रचार करण्यात आला. त्यामुळे वंचितचे स्वबळावर ४१ प्रभागांमध्ये ५८ उमेदवार निवडणूक लढवत असल्याची माहिती पक्षाचे शहर अध्यक्ष अजित तायडे आणि सचिव बी.पी. सावळे यांनी दिली.
तायडे म्हणाले, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या आघाडीबरोबर दोन बैठका झाल्या. त्यामध्ये ४० जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्यावर काँग्रेसकडून काहीही निर्णय घेण्यात आले नाही. मात्र वंचितबरोबर युती झाल्याचा खोटा प्रचार काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून करण्यात आला. असाच प्रस्ताव सुप्रिया सुळे यांनाही देण्यात आला होता. भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध आले तेथे वंचितकडे उमेदवार होता. परंतु काँग्रेस आणि उद्धवसेना यांनी या ठिकाणी उमेदवार न देता भाजपला मदत केली असल्याचा आरोप तायडे यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु