
मुंबई, 8 जानेवारी (हिं.स.)। जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व विचारवंत डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने देशाने पर्यावरण संवर्धनाचा एक दीपस्तंभ गमावला आहे. जैवविविधता जतन, शाश्वत विकास आणि लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण याबाबत त्यांनी दिलेले विचार व कार्य पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. पश्चिम घाट संरक्षणासह पर्यावरण जागृतीसाठी त्यांनी मांडलेली मूल्याधारित भूमिका सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉ. गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली.
जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ, विचारवंत आणि गाडगीळ समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून पर्यावरण मंत्री मुंडे म्हणाल्या की, डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने देशाच्या पर्यावरण चळवळीला आणि शास्त्रीय संशोधन क्षेत्राला मोठी हानी झाली आहे. डॉ. गाडगीळ यांनी जैवविविधता संवर्धन, शाश्वत विकास आणि पर्यावरणीय धोरणांच्या मांडणीसाठी आयुष्यभर कार्य केले.
भारतातील पर्यावरण संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जैवविविधता, लोकसहभागातून संवर्धन आणि पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व त्यांनी सातत्याने अधोरेखित केले. “पर्यावरण म्हणजे केवळ निसर्ग नाही, तर माणसाचा भविष्यासोबतचा करार आहे,” हा त्यांचा विचार आजही दिशादर्शक ठरणार आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील शास्त्रज्ञ, निर्भीड विचारवंत आणि निसर्गाचा संरक्षक काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते, अशा शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी संवेदना व्यक्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर