सेलू शहरात राष्ट्रीय महामार्ग 548 बी वर गतिरोधक बसविण्याचे काम सुरू
परभणी, 08 जानेवारी (हिं.स.)। सेलू शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी वरून सुसाट वेगाने धावणार्‍या वाहनांमुळे झालेल्या अपघातांत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकजण कायमचे जायबंदी झाले. या पार्श्‍वभूमीवर या महामार्गावर गतिर
सेलू शहरात राष्ट्रीय महामार्ग 548 बी वर गतिरोधक बसविण्याचे काम सुरू


परभणी, 08 जानेवारी (हिं.स.)। सेलू शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी वरून सुसाट वेगाने धावणार्‍या वाहनांमुळे झालेल्या अपघातांत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकजण कायमचे जायबंदी झाले. या पार्श्‍वभूमीवर या महामार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी गेल्या एक वर्षापासून होत होती. श्री वेंकटेश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र मागणीची दखल न घेतल्याने अखेर मोरेगाव येथील दुधना नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाच्या इशार्‍याची दखल घेत प्रशासनाने अखेर पावले उचलली असून संबंधित महामार्गावर गतिरोधक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या गतिरोधकांमुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहणार असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये व नागरिक जखमी होऊ नयेत, एवढीच माफक अपेक्षा असल्याचे श्री वेंकटेश्‍वर प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. या कामासाठी सहकार्य करणारे सर्व सहकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग 548 बी चे अभियंते यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande