मदरशांबाबत मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर कारवाईची मागणी
अकोला, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।अकोला येथील जावेद जकारिया (प्रदेश संघटक सचिव, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत मंत्री नितेश राणे यांनी मदरशांबाबत केलेल्या आक्षेपार्ह व विभाजनकारी वक्
Photo


अकोला, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।अकोला येथील जावेद जकारिया (प्रदेश संघटक सचिव, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत मंत्री नितेश राणे यांनी मदरशांबाबत केलेल्या आक्षेपार्ह व विभाजनकारी वक्तव्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात जावेद जकारिया यांनी नमूद केले आहे की, मंत्री नितेश राणे यांनी अलीकडे “मदरसे आतंकवादी तयार करण्याचे अड्डे आहेत, त्यांचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही” असे वक्तव्य केले. हे विधान अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून संबंधित मंत्री वारंवार अशा प्रकारची विधाने करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या वक्तव्यांमुळे एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जात असून राज्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.जकारिया यांनी पुढे म्हटले आहे की, अशा सातत्यपूर्ण विधानांमुळे शासन अशा वक्तव्यांना मूकसंमती देत असल्याचा समज जनतेमध्ये निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारची सर्वसमावेशक प्रतिमा आणि सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो. श्रद्धा, धर्म आणि शैक्षणिक संस्थांची विनाकारण बदनामी होणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र ही सर्व धर्मीयांनी एकत्र नांदणारी आणि प्रगतीकडे वाटचाल करणारी भूमी असल्याचे नमूद करत, समाजात तणाव निर्माण करणारी विधाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला व संविधानिक मूल्यांना धरून नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित मंत्र्यांना कडक समज द्यावी तसेच भविष्यात अशा प्रकारची विभाजनकारी विधाने होऊ नयेत यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी जावेद जकारिया यांनी केली आहे. राज्यात सामाजिक सलोखा, बंधुता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande