परभणी - उपमहापौर गणेश देशमुख यांची प्रभाग ‘अ’ कार्यालय व अग्निशमन केंद्र बांधकाम पाहणी
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.) :परभणी शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश देशमुख यांनी शुक्रवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.00 वाजता प्रभाग समिती ‘अ’ कार्यालयाला भेट दिली. सहायक आयुक्त जुबेर हाश्मी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. भेटी
उपमहापौर गणेश देशमुख यांची प्रभाग समिती ‘अ’ कार्यालयास भेट; कामकाजाचा आढावा


परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.) :परभणी शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश देशमुख यांनी शुक्रवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.00 वाजता प्रभाग समिती ‘अ’ कार्यालयाला भेट दिली. सहायक आयुक्त जुबेर हाश्मी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

भेटीदरम्यान उपमहापौरांनी कर वसुली, स्वच्छता, विद्युत व पाणीपुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. प्रभाग समितीद्वारे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेत अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी नागरिकांना वेळेत सुविधा देण्याच्या सूचना देत मालमत्ता कर व पाणीपट्टी विलंबशास्ती सवलत ‘अभय योजना’ची माहिती देऊन जनजागृती करण्याचे तसेच वसुलीसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याचे निर्देश दिले.

स्वच्छता विभागाला प्रभागासाठी आवश्यक आराखडा तयार करून नियोजनबद्ध कामकाज करण्याचे, रिकाम्या प्लॉटमधील कचरा व घाण साफ करण्यासाठी जागामालकांना नोटीस बजावण्याचे, नाल्यांवरील अतिक्रमण हटवून नाले मोकळे करण्याचे, व्यापारी व नागरिकांनी कचरा घंटागाडीत टाकावा यासाठी आवाहन करण्याचे तसेच मुख्य बाजारपेठ व मंदिर-मशिदी परिसराची दैनंदिन स्वच्छता सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भयमुक्त वातावरणात नियमानुसार कामकाज करावे व अडचणी तात्काळ कळवाव्यात, असेही उपमहापौरांनी सांगितले. यावेळी शाखा अभियंता राहुल धुतडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास रत्नपारखे, अभियंता संतोष लोंढे, प्रविण हाटकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर, उपमहापौरांनी दुपारी 1.30 वाजता अपना कॉर्नर येथील अग्निशमन केंद्राच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे निरीक्षण केले. संबंधित अभियंत्यांना बांधकामाची गुणवत्ता राखून काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

----------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande