
पुणे, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असून, सुमारे पावणे तीन हजार चौरस फुटांच्या सभा मंडपाचे काम केवळ चार महिन्यांत पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागामार्फत करण्यात येत असून, दगडातील हे बांधकाम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे पदाधिकारीही याला अनुकूल असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. यासाठी २८८ कोटी १७ लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. तर केवळ सभामंडपासाठी १० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या ऐतिहासिक सभामंडपाची पुनर्बांधणी हा सांस्कृतिक, स्थापत्य आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. कमी वेळेत पारंपरिक साहित्य व तंत्रांचा वापर करून, उत्कृष्ट कारागिरीच्या साहाय्याने पूर्ण झालेला हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरणार असून, याची जागतिक पातळीवर नोंद व्हावी, यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु