
रायपूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।छत्तीसगड राज्यातील बीजापूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. बीजापूर येथे इंद्रावती नदीलगतच्या जंगलात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईनंतर एसएलआर (सेल्फ-लोडिंग रायफल) आणि एक इन्सास रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की गुरुवारी सकाळी इंद्रावती नदीकाठच्या जंगलात सुरक्षा दलांची संयुक्त टीम नक्षलविरोधी मोहिमेवर असताना गोळीबार सुरू झाला.त्यांनी सांगितले की गोळीबार थांबल्यानंतर गणवेश परिधान केलेल्या दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह, एक सेल्फ-लोडिंग रायफल, एक इन्सास रायफल आणि एक १२-बोअर रायफल घटनास्थळावरून जप्त करण्यात आली. शोधमोहीम अद्याप सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने माओवादी चळवळ संपवण्यासाठी यंदा ३१ मार्चपर्यंतची अंतिम मुदत निश्चित केली आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या या कारवाईनंतर, यावर्षी आतापर्यंत राज्यात विविध चकमकींमध्ये किमान २५ माओवादी ठार झाले आहेत.यापूर्वी, ३ जानेवारी रोजी बस्तर विभागात झालेल्या दोन चकमकींमध्ये १४ माओवादी ठार झाले होते. या बस्तर विभागात बीजापूरसह सात जिल्ह्यांचा समावेश होतो. गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या विविध चकमकींमध्ये एकूण २८५ माओवादी ठार झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode