
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढ दर ७.८ टक्के नोंदवला गेला आहे. हा दर दुसऱ्या तिमाहीतील ८.४ टक्क्यांपेक्षा कमी असला तरी बाजारातील अंदाजापेक्षा चांगला आहे.
यावेळी जीडीपीची गणना २०११-१२ या आधार वर्षाऐवजी २०२२-२३ या नवीन आधार वर्षावर करण्यात आली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. आकडेवारीनुसार, नवीन जीडीपी मालिकेनुसार चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत आर्थिक वाढ दर ७.८ टक्के राहिला आहे.
नवीन मालिकेनुसार चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जीडीपी वाढ दर ७.६ टक्के राहण्याची अपेक्षा आहे, तर यापूर्वी तो ७.४ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आकडेवारीनुसार, नवीन मालिकेनुसार तिसऱ्या तिमाहीतील वास्तविक जीडीपी ८४.५४ लाख कोटी रुपये इतकी नोंदवली गेली, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ७८.४१ लाख कोटी रुपये होती.
यासोबतच, चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीतील वाढ दरात सुधारणा करून तो ८.४ टक्के करण्यात आला आहे, जो यापूर्वी ८.२ टक्के असा अंदाजित करण्यात आला होता. मात्र, एप्रिल-जून तिमाहीतील वाढ दर ७.८ टक्क्यांवरून कमी करून ६.७ टक्के करण्यात आला आहे.
हे जीडीपीचे अंदाज नवीन राष्ट्रीय उत्पन्न मालिकेनुसार जाहीर करण्यात आले आहेत. आता २०११-१२ या आधार वर्षावर आधारित जुन्या मालिकेऐवजी २०२२-२३ हे नवीन आधार वर्ष निश्चित करण्यात आले आहे. आर्थिक आकडेवारी अधिक अचूक करण्यासाठी या नव्या मालिकेत वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), ई-वाहने तसेच घरगुती सेवांचे आकडे समाविष्ट करण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule