
- दादांचे देवगिरी बंगल्यावर स्मारक व्हावे
मुंबई, २७ फेब्रुवारी (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. यावेळी पवार यांनी चौकशीत पारदर्शकता यावी, दादांचे देवगिरी बंगल्यावर स्मारक व्हावं, सुदीप जाधव यांच्या पत्नीला नोकरीत कायम या प्रमुख तीन मागण्या केल्या आहेत. दरम्यान गुन्हा दाखल करण्याबाबत काही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तांत्रिक अडचणींबाबत काय आहे हे समजून घेतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे.
रोहित पवार यांनी याबाबत माध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्र्याची भेट घेण्याचं कारण हे, माझ्या आणि महाराष्ट्रातील सर्वांच्या मनात ज्या शंका आहेत, त्या शंका घेऊन मी मुख्यमंत्र्यांपुढे बाजू मांडली. सगळे रिसर्च पेपर आणि कागदपत्रे माझ्याकडे आले आहेत, ते मी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. देशातही आज भाजपचे सरकार आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री असतील किंवा वरिष्ठ नेते असतील त्यांच्याकडेही बाजू मांडावी. या चौकशीत पारदर्शकता यावी, अशी आग्रही मागणी मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच, आणखी काही कागदपत्रांची मागणी त्यांनी माझ्याकडे केली, ती कागदपत्रे घेऊन ते गृहमंत्री अमित शाह यांना भेटतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारकडून हा अहवाल येणार आहे, उद्यापर्यंत हा अहवाल येईल अशी अपेक्षा आहे. थातूरमाथुर अहवाल देऊ नका, डिटेल्स अहवाल आम्हाला हवा आहे. सोमवारी 11 वाजता मी डिटेल्स पत्रकार परिषद घेणार आहे, आणखी काही गोष्टी समोर आणणार आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
सोबतच दिवंगत अजित पवार गेल्या 22 वर्षांपासून मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राहात होते. या ठिकाणी अजित दादाचं स्मारक असावं अशी मागणी मी केली आहे. विधानभवन परिसरातही दादांचं स्मारक व्हावं, बारामती विमानतळावर नाईट लँडिंग व्हावी, अत्याधुनिक विमानतळ व्हावं, या विमानताळाला अजित दादांचा नाव द्यावं, अशा विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती रोहित पवारांनी दिली. तर, पुण्याच्या रिंग रोडलाही अजित पवार यांचं नाव द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अजित दादांसोबत सुरक्षा रक्षक सुदीप जाधव यांचाही मृत्यू झाला, त्यांच्या पत्नी ठाणे महापलिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर आहेत, त्यांना पर्मनंट करावं, अशी विनंतीही रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी