
रत्नागिरी, 26 फेब्रुवारी, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात १६ वर्षांनी गृह गणनेला सुरुवात होत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२७ च्या जनगणनेला मंजुरी दिल्यानंतर, त्याचा पहिला टप्पा म्हणून जिल्ह्यात १६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत घरांची नोंदणी केली जाणार आहे.
विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने (मोबाइल ॲपद्वारे) पार पडणार आहे. नियमानुसार २०१० नंतर २०२० मध्ये गृहगणना होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही प्रक्रिया अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता प्रशासनाने कंबर कसली असून १६ मेपासून शिक्षकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन माहिती संकलित केली जाणार आहे.यावेळी मोबाइल ॲपचा वापर केला जाणार असल्याने माहिती अचूक राहण्यास आणि कामाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. या प्रक्रियेत केवळ घरांची संख्या मोजली जाणार नसून नागरिकांच्या राहणीमानाचा सविस्तर आढावा घेतला जाईल. त्यामध्ये घराचा क्रमांक, मालकाचे नाव आणि घराचा प्रकार पक्के की कच्चे, घराचा वापर निवासासाठी होतो की व्यावसायिक कारणांसाठी, पिण्याचे पाणी, वीजजोडणी, स्वच्छतागृह, स्वयंपाकाचा गॅस आणि ड्रेनेज व्यवस्था, घरातील एकूण सदस्य संख्या आणि उपलब्ध सोयीसुविधा यांचा त्यात समावेश असेल.
या गणनेतून समोर येणाऱ्या माहितीमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती आणि गरजा स्पष्ट होणार आहे. भविष्यात विविध शासकीय योजनांचे नियोजन करताना आणि त्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नोंद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.रत्नागिरीत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १६ ते ३० मे २०२६ या काळात गृहगणना झाल्यानंतर दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून त्यामध्ये लोकसंख्या गणना केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी