
तिरुवनंतपुरम, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘द केरळ स्टोरी २ – गोज बियॉन्ड’ या चित्रपटाच्या प्रदर्शानावर अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या चित्रपटाच्या रिलीजवर १५ दिवसांची रोक लावली. प्रथमदर्शनी असे दिसते की सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र देताना आवश्यक ती काळजी घेतलेली नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर सुनावणी करताना हा आदेश दिला. हा चित्रपट २७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. न्यायालयाने आपल्या आदेशात असेही म्हटले की सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने केलेले दिसत नाही.
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये ‘द केरळ स्टोरी २’च्या निर्मात्यांना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) कडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्राला आव्हान देण्यात आले आहे. याचिकांमध्ये दावा करण्यात आला आहे की चित्रपटात केरळचे चुकीचे चित्रण करण्यात आले असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की चित्रपटाचे शीर्षक आणि प्रचार साहित्य दोन्ही केरळचे चुकीचे चित्र उभे करतात. त्यातील काही आशय समाजातील बंधुभावाला तडा देऊ शकतो आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतो. एका याचिकेत चित्रपटाच्या शीर्षकातून ‘केरळ’ हा शब्द वगळण्याचे निर्देश देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode