
जळगाव, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘स्थायी समिती’ आणि ‘महिला व बालकल्याण समिती’ सभापती पदासाठी गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दोन्ही समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, ही निवड आता केवळ औपचारिकता उरली असून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर दुसरीकडे, महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई विजय कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज विहित वेळेत नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे सुपूर्द केले. अर्ज दाखल करण्याच्या वेळी महापालिका परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती आणि राजकीय वातावरण उत्साहाचे दिसून आले. यावेळी दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपतर्फे गटनेता प्रकाश बालाणी, उपगटनेता नितीन बरडे, स्थायी समिती सदस्य दीपक सूर्यवंशी, विशाल भोळे तर महिला बालकल्याण समिती सदस्य सुरेखा तायडे, रंजना वानखेडे, पूजा जगताप आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर