
सोलापूर, 26 फेब्रुवारी, (हिं.स.) - महापालिका निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार निवडून येणे ही धोक्याची घंटा आहे. प्रत्येक पक्षाची ध्येयधोरणे वेगळी असतात. मात्र, प्रथम राष्ट्रहित हे भाजपचे धोरण आहे. त्याच्या विपरीत कार्य करणाऱ्यांना रोखणे ही आपली जबाबदारी असून त्यांना निष्प्रभ करा, असे आवाहन भाजपच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक यांनी केले.
शहर भाजप कार्यालयात नूतन नगरसेवकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अनेक शहरांत विरोधक औषधालाही उरले नसल्याचे सांगून त्या म्हणाल्या, जनतेने भाजपला स्वबळावर सत्ता दिली आहे, त्यांचा विश्वास टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी पक्षांतर्गत विरोध न करता एकदिलाने काम करा. प्रतिकूल परिस्थितीत काम करत पक्षाने हे यश मिळविले आहे.त्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे पक्षाचा विचार समजून घ्या. शहराचा विचार करा. सभागृहात नोंद घेतली जाईल, अशाप्रकारे प्रश्न मांडा. फक्त विकासाचा अजेंडा राबवा. अंत्योदय हाच पक्षाचा विचार आहे. त्याच दृष्टीने शेवटच्या माणसासाठी केंद्र व राज्य सरकार योजना राबवत आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सरचिटणीस सुधा अळ्ळीमोरे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, नगरसेविका रंजिता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड