मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राजीनामा द्यावा, विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग !
मुंबई, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - मंत्रालयातील लाच प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी काॅंग्रेस आ. सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली; मात्र ही मागणी सभापती राम शिंदे यांनी फेटाळून लावली. या कारण
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राजीनामा द्यावा, विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग !


मुंबई, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - मंत्रालयातील लाच प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी काॅंग्रेस आ. सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली; मात्र ही मागणी सभापती राम शिंदे यांनी फेटाळून लावली. या कारणास्तव विरोधी सदस्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत येऊन गदारोळ केला. तसेच सरकारच्या विरोधात घोषणा देत सभात्याग केला.

सतेज पाटील यांनी नियम २८९ अन्वये हे मंत्रालयातील लाच प्रकरणाचा मुद्दा मांडून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, माझ्या दालनातील लिपिक राजेंद्र ढेरंग यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या घटनेचा माझा कोणताही संबंध नाही. त्या वेळी मी दिल्ली येथे होतो. ढेरंग यांना निलंबित करण्यात आले आहे. माझ्या राजकीय जीवनात मी अशा घटनांना कधीही पाठीशी घालणार नाही. माझे सचिव डॉ. रामदास गाडे यांनाही जबाबदार धरून त्यांना माझ्या विभागातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे, असे सांगताच विरोधकांनी याला आक्षेप घेतला. त्यांनी मंत्री झिरवाळ यांनी राजीनामा देण्याची मागणी लावून धरली. सभापती प्रा. राम शिंदे यांनी पुढील कामकाज चालू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande