पंतप्रधान मोदींनी इस्रायली राष्ट्रपतींची घेतली भेट
नवी दिल्ली , 26 फेब्रुवारी (हिं.स.)। इस्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘याद वाशेम’ला भेट दिली. येथे त्यांनी नाझी राजवटीत ठार मारण्यात आलेल्या ६० लाख यहुदींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्य
पंतप्रधान मोदींनी इस्रायली राष्ट्रपतींची घेतली भेट


नवी दिल्ली , 26 फेब्रुवारी (हिं.स.)। इस्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘याद वाशेम’ला भेट दिली. येथे त्यांनी नाझी राजवटीत ठार मारण्यात आलेल्या ६० लाख यहुदींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्जोग यांच्यासह ‘एक झाड आईच्या नावाने’ या उपक्रमांतर्गत प्रेसिडेन्शियल गार्डनमध्ये एक रोप लावले.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये याला नरसंहारातील पीडितांना अर्पण केलेला सन्मान असे म्हटले आहे. त्यांनी लिहिले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड होलोकॉस्ट रिमेंबरन्स सेंटर ‘याद वाशेम’ला भेट दिली. ‘याद वाशेम’ला पंतप्रधानांची ही दुसरी भेट होती. त्यांनी होलोकॉस्टमधील पीडितांना पुष्पांजली अर्पण केली. तसेच ‘बुक ऑफ नेम्स हॉल’लाही भेट दिली, जिथे होलोकॉस्टदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या लाखो लोकांची नोंद आणि स्मृती जतन करण्यात आली आहे.”पोस्टनुसार, हे स्मारक भूतकाळातील क्रौर्य आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची आणि अधिक चांगले जग निर्माण करण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाची आठवण करून देते.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्जोग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत-इस्रायल भागीदारी अधिक बळकट करण्याबाबत चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, शिक्षण, स्टार्ट-अप्स, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांतील सहकार्य अधिक वाढवण्याच्या मार्गांवर अर्थपूर्ण चर्चा झाली.त्यानंतर दोघांनी ‘एक झाड आईच्या नावाने’ या उपक्रमांतर्गत प्रेसिडेन्शियल गार्डनमध्ये एक रोप लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्जोग यांना लवकरच भारत भेटीचे निमंत्रणही दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसीय राजकीय दौरा गुरुवारी संपणार आहे. त्याआधी दोन्ही देशांचे पंतप्रधान प्रसारमाध्यमांना संबोधित करणार आहेत.

बुधवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी सारा नेतान्याहू यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायली संसद ‘नेसेट’ला संबोधित केले. इस्रायली संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. त्यांना संसदेकडून सर्वोच्च सन्मान ‘स्पीकर ऑफ द नेसेट मेडल’ प्रदान करण्यात आला. आपल्या भाषणात बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “खरे मित्र” आणि “मित्रापेक्षा अधिक भाऊ” असे संबोधले. तसेच त्यांना जगातील महान नेते म्हणत ‘मोदी हग’चाही उल्लेख केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande